साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ | राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता हा वाद कोर्टात सुरु असून यात अनेक मुद्दे समोर येत असल्याने मोठी खळबळ उडत आहे. भाजपसोबत नैतिक आणि तात्त्विक फायद्याची युती असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. जी बेकायदेशीर आणि मतदारांचा विश्वासघात करणारी होती, असे एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या आमदारांचे म्हणणे होते. त्यामुळे त्या आमदारांनी काहीही चुकीचे केलेले किंवा चुकीचे वागलेले नाहीत. तरीही शिवसेनेच्या संघटनात्मक पदावरून काही नेत्यांना काढण्यात आले. त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही, असा युक्तिवाद शिवसेनेचे (शिंदे) वकील महेश जेठमलानी यांनी मंगळवारी सुनावणीदरम्यान केला. प्रतोद सुनील प्रभू यांनी मात्र तो फेटाळून लावला.
शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर बुधवारी सलग पाचव्या दिवशी सुनावणी झाली. शिवसेनेचा (ठाकरे) ठराव, बैठका आणि प्रतोदांनी बजावलेल्या नोटीस बोगस असल्याचा दावा शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात आल्यानंतर वकील जेठमलानी यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात प्रश्न विचारत सुनील प्रभू यांना उलटतपासणीत भंडावून सोडले. पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यास कारवाई करावी लागेल, या आशयाचा मजकूर असलेले पत्र इंग्रजीत का लिहिले इथपासून ते कशाप्रकारे पाठवण्यात आले, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे पेचात पडलेल्या प्रभूना जेवणाआधीच्या सुनावणीपूर्वी दिलेली साक्ष नंतर बदलावी लागली.