साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | देशातील मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असतांना दिल्लीत पुन्हा एकदा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीतील फर्श बाजार परिसरात २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह एका बॅगमध्ये आढळला. रविवारी ही घटना उघड झाली. तरुणीची हत्या झाली असून, तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही तरुणी एका सलूनमध्ये काम करत होती. काही दिवसांपूर्वीच तिचा सुलतान नावाच्या तरुणाशी साखरपुडा झाला होता. तरुणीच्या हत्येनंतर तो पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी विश्वास नगरातील एका इमारतीत एक बॅग संशयास्पद अवस्थेत सापडल्याची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी तात्काळ पोहोचले. ‘त्या भागाची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. बॅग उघडली असता त्यात एका महिलेचा मृतदेह सापडला’, असे पोलिसांनी सांगितले. ‘महिलेच्या डोक्यावर जखमांच्या खुणा होत्या. तिची गळा दाबून हत्या केली असल्याचा संशय आहे’, असेही त्यांनी सांगितले. या घटनेच्या तपासाला नवी दिशा देणारी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पीडितेचा नुकताच साखरपुडा झाला असून, काही दिवसांतच तिचं लग्न होणार होते. ज्या खोलीत मृतदेह सापडला ती खोली तिच्या होणाऱ्या नवऱ्याने भाड्याने घेतली होती. तो पॅकेजिंग आणि डिलिव्हरीचे काम करायचा, असे पोलिसांनी सांगितले.