साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटनासह चोरीच्या घटनेत नियमित वाढ होता असतांना एक धक्कादायक घटना पुन्हा उघडकीस आली आहे. एक तरुण चोरी करण्यासाठी गेला असतांना गाडीवरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चोरी करायला गेलेल्या तरुणाचा गाडीवरुन पडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर शहरात घडली. निखिल तिवारी असे या मृत तरुणाचे नाव असून शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रेट नाग रोडवर हा संपूर्ण प्रकार घडला. हे दोन्ही तरुण दुचाकीवरुन चोरी करण्यासाठी बाहेर पडले होते. दोघांनी दुचाकीवरून जाताना एका व्यक्तीचे ब्रेसलेट हिसकावले. मात्र या तरुणाने स्वतःचा बचाव करण्यासाठी दुचाकीवरील चोरट्याच्या हाताला जोरदार हिसका दिला. या हिसक्याने बेसावध असलेला चोर दुचाकीवरुन रस्त्यावर पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.