साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील यवतमाळ शहरात नागपूर-तुळजापूर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास १५ अनोळखी दुचाकीवर येऊन एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 72 प्रवासी होते. या प्रवाशांना खाली उतरवून अज्ञातांनी बस पेटवली. ही बस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याहून नागपूरकडे जात होती. आगीत बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे.
विदर्भ- मराठवाडा सीमेवर उमरखेडजवळील पैनगंगा नदीच्या पुलावर हा प्रकार घडला. बस नेमकी का पेटवली, अज्ञात कोण होते? याबाबत अजून माहिती समोर येऊ शकली नाही. रात्री घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे.
दरम्यान, राज्यभरात मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झालेला असताना ही बस पेटवण्यामागेही मराठा आंदोलकांचा हाथ असावा, अशी चर्चा सुरु आहे. कारण ही बस ज्या हदगाव तालुक्याहून निघाली होती तिथेही मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण केल जात आहे तसेच, राजकीय नेत्यांनाही गावात बंदी ्आहे. मात्र, गाडी पेटवणारे 10 ते 12 जण कोण होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत माहिती देता येईल, असे पोलिसांनी सांगितले.