साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | गेल्या अनेक दिवसापासून छोटे मोठे अपघाताची मालिका सुरु आहे या अपघातात अनेकांचा जीव देखील जात आहे तर काही गंभीर जखमी होत असतांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक अपघात समोर आला आहे. ऊस तोडणीच्या कामासाठी परिवार आपले सर्व सामान ट्रॅक्टरमध्ये घेऊन मार्गस्थ झाले होते. मात्र या परिवारावर अर्ध्या रस्त्यावरच दुःखाचा डोंगर कोसळला. सामान ठेवलेल्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या एक १४ वर्षीय मुलगा खाली पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणीच्या कामासाठी ऊसतोड कामगार इकडून तिकडे जात असतात. यात त्यांना आपला संपूर्ण संसारोपयोगी साहित्य देखील न्यावे लागत असते. या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जामगाव येथील साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी कुटुंब रवाना झाले होते. मात्र कारखान्यापर्यंत पोहचण्यापूर्वीच परिवारावर आक्रोश करण्याची वेळ आली.
कारखान्याच्या ठिकाणी कुटुंबासह जाताना ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून १४ वर्षीय दीपक नवनाथ मोरे याचा मृत्यू झाला. ही घटना लासुर गंगापूर मार्गावरील सिद्धनाथ वाडगाव येथे घडली. या घटनेची नोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून अपघातातील ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.