साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | राज्यात गेल्या काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या कंत्राटी नोकरभरती बाबत अनेक आरोप प्रत्यारोप होत असतांना शुक्रवारी अखेर हा निर्णय शासनाने रद्द केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषद घेत हा निर्णय रद्द केला असल्याची माहिती दिली. कंत्राटी भरतीचं १०० टक्के पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचं आहे असा आरोप फडणवीस यांनी केला. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय योग्य होता. पण विरोधकांनी याबाबत तरुणांमध्ये गैरसमज पसरवला. नोकऱ्या जाणार, नोकऱ्या मिळणार नाही, असा गैरसमज अनेकांचा होता. म्हणून आम्ही हा निर्णय मागे घेतला, असं देखील ते म्हणाले. याआधी सुद्धा अजित पवार यांनी कंत्राटी भरतीचं समर्थन केलं होतं. त्यांचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका देखील केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय योग्य होता, असं म्हणत या निर्णयाचं समर्थन केलं आहे.