साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक गावात चोरीसह दरोड्याच्या घटना सातत्याने घडत आहे. यावर पोलीस विभाग देखील कारवाई करीत आहे. नुकतेच मुक्ताईनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दरोड्यापूर्वीच कुविख्यात चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोंपीकडून कारसह तलवार, दोर व दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना मुक्ताईनगर ते कुर्हा रोडवर चिंचखेडा गावाच्या फाट्याजवळ दरोड्याच्या तयारीत संशयित आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास पथकाला रवाना केल्यानंतर इको कार (एम.एच.19 ई.ए.4608) आल्यानंतर कारची झडती घेतली असता त्यात तलवार, दोर, सुरा तसेच दरोड्यासाठी लागणारे साहित्य आढळल्याने चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
मुक्ताईनगर पोलिसांनी कन्वरलाल रामप्रसाद पवार (35), देव डॅनी पवार (22), राहुल कापीलाल भोसले (23), करण कपूर डॅनी पवार (24, सर्व रा.मधापुरी, ता.मुक्ताईनगर) या चौघांना अटक केली. आरोपींकडून कारसह रोकड, मोबाईल मिळून चार लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस नाईक प्रदीप इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहे.