साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | दिवाळी निमित्त ग्रामीण भागातून अनेक नागरीक खरेदीसाठी जळगावात दाखल होत असतात हीच दिवाळीची खरेदी करून जामनेर येथे परतत असताना प्रतिभा सुभाष परखड (वय ४८) यांची २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लांबविली. ही घटना शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी जळगावातील नवीन बसस्थानकात घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील गिरीजा कॉलनीत प्रतिभा परखड या वास्तव्यास असून शनिवारी त्या भावासोबत दिवाळीची खरेदी करण्यासाठी जळगावात आल्या होत्या. खरेदी झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्या जामनेर जाण्यासाठी नवीन बस स्थानकात आल्या. याठिकाणी बस उभी असल्याने बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी परखड यांच्या गळ्यातून २० हजार रुपये किंमतीची पोत लांबवून नेली.