साक्षीदार | ८ नोव्हेबर २०२३ | येत्या काही दिवसावर दिवाळीचा सण येवून ठेपला असतांना अनेक शेतकऱ्यांची दिवाळी दुखात असतांना राज्य सरकारने आता दिवाळी गोड केली आहे. राज्यातील तब्बल 35 लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ही विमा रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25% अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्य स्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीकविमा कंपन्यांची धनंजय मुंडे यांनी बैठक घेऊन, अग्रीमचा तिढा तातडीने सोडवण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पीकविमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले होते.