साक्षीदार | १८ नोव्हेबर २०२३ | धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या विरोधात आता विनयभंगासोबतच बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवपूर पोलिस स्टेशनमध्ये १३ नोव्हेंबर रोजी एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून, पाटील यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पीडित महिलेने न्यायालयात, पाटील यांनी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा जबाब दिला. त्यानुसार पाटील यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाचे कलम ३७६(१) अन्वयेही गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्यांना निलंबित केल्याचा आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर पाटील यांच्याकडून प्राप्त झाल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी सुरू करण्यात आली आहे. निलंबन कालावधीत हेमंत पाटील यांचे पोलिस मुख्यालय नंदुरबार हे असेल. काही दिवसांपूर्वीच त्यांची नंदुरबारला बदली करण्यात आली होती. त्यांना नंदुरबार पोलिस अधीक्षकांच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पाटील फरार असल्याने त्यांना अटक करण्यासाठी दोन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत…