साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ | एरंडोल तालुक्यातील कागझीपुरा भागातील बंद घरातून चोरी झालेल्या अडीच लाख रुपये रोख व ४३ ग्रॅम सोन्याच्या चोरीचा पोलिसांनी सात दिवसांत छडा लावला आहे. चोरट्यांकडून रोकड व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील तीन आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. एक अद्याप फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कागजीपुरा भागातील खालीद अहमद रफिक अहमद हे दि. १५ ते १७ नोव्हेंबरपर्यंत दोन दिवस अमरावती येथे नातेवाइकांच्या लग्नाकरिता गेले असता १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सातला ते परत आले. त्यांना घरातील २ लाख ३८ हजार ६४२ रुपये किमतीचे ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने व २ लाख ५० हजार रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८८ हजार ६४२ रुपयांचा ऐवज घरातून लांबवल्याचे लक्षात आले. यात चोरांनी घराच्या मागील दाराला छिद्र पाडून अलगद दरवाजा उघडला व घरात प्रवेश करून ऐवज लांबवला. दरम्यान, एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे हे तपास करीत असताना त्यांना घटनास्थळावरील परिस्थितीवरून ही चोरी फिर्यादीच्या जवळच्या लोकांनी व माहीतगारांनी केल्याची शक्यता दिसून येत होती.
कागझीपुरा येथे राहणारे आझाद शेख शब्बीर चौधरी (वय २३), मेहंदी रजा शेख अली अहमद (३५), कलीम शेख रहीम (३७) यांच्यावर पोलिसांना संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्यासह कलीम शेख यांचा सासरा आसिफ (मालेगाव) अशा एकूण चारजणांनी चोरी केली असल्याचे कबूल केले. चौथा आरोपी आशिफ हा फरार आहे. आरोपींकडून ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात यश आले आहे. चोरी करताना फिर्यादीच्या घरातील दुसऱ्या कोणत्याही वस्तू अस्ताव्यस्त न केल्याने चोरी ही जवळच्या व्यक्तीने केली असल्याचा संशय बळावला. कारवाईत पो. हे. कॉ. अनिल पाटील, सुनील लोहार, विलास पाटील, जुबेर खाटिक, पोलिस नाईक अकील मुजावर, पोलिस शिपाई प्रशांत पाटील, पंकज पाटील, पोलिस चालक हेमंत घोंगडे, गृहरक्षक दलाचे दिनेश पाटील, आदींनी सहकार्य केले.