साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३
राज्यातील मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी सलग तिसऱ्या दिवशी देखील चक्काजाम आंदोलन केले असून वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि एकदिवशीय अधिवेशन घेण्याची त्यांची प्रामुख्याने मागणी आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बुधवारी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळे ठोकले होते. यानंतर पोलिसांनी या आमदारांना व्हॅनमध्ये घालून नेले होते. आज पुन्हा हे आमदार मंत्रालयाबाहेर दाखल झाले आणि रास्तारोको करू लागले होते. त्यामुळे आज पुन्हा पोलिसांनी येत या आमदारांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बुधवारी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाच्या गेटला टाळे ठोकले होते. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा नाहीतर एकाही मंत्र्याला आत जाऊ देणार नाही, अशी मागणी करत त्यांनी तिथेच पायऱ्यांवर ठिय्या मांडला. पोलिसांनी हस्तक्षेप करत या आमदारांना ताब्यात घेऊन दरवाजा पुन्हा उघडला.
सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक सुरू असतानाच मंत्रालयात अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. 16 आमदार या आंदोलनात सहभागी होते. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार पैलास पाटील आणि राहुल पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे दिलीप बनकर, यशवंत माने, नीलेश लंके, अमोल मिटकरी, राजू नवघरे, चेतन तुपे, शेखर निकम, राजेश पाटील, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब आजबे, विक्रम काळे, सुनील शेळके, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्राणी तर काँग्रेसचे मोहनराव उंबर्डे सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांच्या गाडीतूनच प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे पैलास पाटील म्हणाले, ’मराठा समाजाला सरसकट आरक्षण हवे आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. मराठा समाजाचा उद्रेक थांबवायचा असेल तर आरक्षणाचा निर्णय वेळेत व्हायला हवा. मात्र सरकार वेळकाढूपणा करीत आहे.’