साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ | देशातील अनेक मोठ्या शहरात वंदे भारत एक्स्प्रेस धावत असतांना याच रेल्वेने एका परिवारातील तीन जणांना ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिवाराला रेल्वेचे फाटक बंद असताना रूळ ओलांडणे चांगलेच महागात पडले आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मेरठ येथील कंकरखेडा विभागातील कासमपूर रेल्वे फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. दिल्लीहून सहारनपूरकडे वंदे भारत एक्स्प्रेस जात होती. कासमपूर फाटकावर नरेश हा आपल्या कुटुंबासह रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याचवेळी वंदे भारत एक्स्प्रेसची त्यांना धडक लागली. यात महिलेसह तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मोना असं मृत महिलेचे नाव आहे. तर चारू आणि इशिका अशी मुलींची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलीस आणि लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांच्या मदतीने रेल्वे रुळांवरून त्यांचे मृतदेह उचलले. ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिला आणि तिच्या दोन मुलींचा वंदे भारत एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झाला. एक्स्प्रेस येणार असल्याने रेल्वे फाटक बंद होते. तिघेही फाटकातून रेल्वे रूळ ओलांडून जात होते. त्याचवेळी एक्स्प्रेस आली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.