साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | राज्यात ड्रग्सचा मुद्दा चांगलाच पेटला असतांना आता बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्स सदृश पदार्थाच्या सेव्नानाने गेल्या वर्षभरात तब्बल ७ जणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री देखील होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन सुटले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात ड्रग्सप्रमाणे दिसणाऱ्या पावडरची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. खामगाव, लाखनवाडा आणि सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा या गावांमध्ये याचे मोठे जाळे असल्याचे बोलले जात आहे. या अमली पदार्थाला ताडीची पावडर तर कुणी ड्रग्स म्हणत आहे. ही पावडर पाण्यामध्ये मिश्रित करून त्याचे सेवन केले जाते. हे प्रमाण वाढत चालले असून देखील यावर अपेक्षित अशी कारवाई होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.
साखरखेर्डा गावात ड्रग्ज सदृश्य पदार्थाचे सेवन केल्याने वर्षभरात सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेक जणांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळे या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी साखरखेर्डा गावकऱयांनी केली आहे. तशी तक्रार एमआयएमच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली आहे.