साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | मुंबई येथे असलेल्या मुलाकडे गेलेल्या सलीम महेबूब तडवी (५८, रा. संस्कार कॉलनी, वाघनगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपयांसह ५० हजार रुपयांचे दागिने असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरकाम करणारी महिला रविवार, ५ नोव्हेंबर रोजी कामासाठी गेली त्यावेळी ही चोरी उघडकीस आली. या प्रकरणी सोमवार, ६ नोव्हेंबर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील वाघ नगर परिसरातील संस्कार कॉलनी येथील रहिवासी सलीम तडवी व त्यांच्या पत्नी ३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मुलाकडे गेले होते. घरी केवळ त्यांची मुलगी होती. ५ नोव्हेंबर रोजी ती मैत्रिणीकडे जेवणासाठी गेली त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ४० हजार रुपये रोख व ५० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून केले. दुपारी तीन वाजता घरकाम करणारी महिला कामासाठी गेली असता, तिला मागचा व पुढचा दरवाजा उघडा असल्याचे व घरात कोणीही नसल्याचे दिसले. त्या वेळी या महिलेने तडवी यांना माहिती दिली. त्या वेळी मुलीने घरी येऊन पाहिले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. ६ रोजी तडवी दाम्पत्य घरी परतले. त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.