MLA
साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून मागील वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार शिवसेना सोडून बाहेर पडले होते. त्यातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी होती. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आज दुपारी 2 वाजता होणार आहे.
जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीमध्ये होणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे सुनावणी एक दिवस आधी घेण्यात येत असल्याची माहिती आहे. याच प्रकरणात 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना अपात्र आमदारांची सुनावणीला विलंब होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलं सुनावलं होतं. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींना वेग आला आहे. 13 ऑक्टोबर रोजी शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र विधानसभा अध्यक्षांकडून या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही सुनावणी आज पार पडणार आहे.