साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३
जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर वाहन लावण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. नारळ विक्रेत्याने थेट कोयत्याने वार केल्याने एका जणाला जखम झाली. या ठिकाणी आलेल्या एका महिलेनेदेखील मी पोलिस आहे, असे म्हणत डॉक्टरांना मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. नीरज चौधरी हे रविवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी पांडे चौक परिसरातील नीलकमल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारने (क्र. एमएच १९, सीएफ ५६२८) आले होते. ही कार त्यांनी रुग्णालयासमोर उभी केली व ते मध्ये जात असताना एक जण तेथे आला व या जागेवर मी नारळाची गाडी लावतो, तुम्ही गा काढून घ्या. दुसरीकडे जागा नसल्याचे सांगून डॉ. चौधरी हे रुग्णालयात निघून गेले. काही वेळाने एका कर्मचाऱ्याने हातगाडीवाला इसम तुमच्या गाडीची तोडफोड करीत आहे, असे सांगितले. त्या ठिकाणी त्यांनी येऊन पाहिले असता दोन जण त्यांच्या अंगावर धावून आले व त्यांची कॉलर पकडली. डॉक्टरांचे दोघे सहकारी तेथे आले असता त्यांनादेखील मारहाण केली. त्यातील एकाने नारळाच्या गाडीवरून कोयता आणून दांगोडे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या हाताला जखम झाली.