जळगाव ; – अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई सुरू असताना वरणगावच्या मंडळ अधिकारी रजनी तायडे यांच्या अंगावर वाळूचे डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील डंपरमालक आणि चालक यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. व डंपर मालक सुभाष पंडित कोळी असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींचे नावे आहे.
बेकायदेशीरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी वरणगावच्या मंडळ अधिकारी रजनी तायडे व पथक गेलेले असताना त्यांनी भरधाव जाणाऱ्या (एमएच १९ झेड ४६७९) क्रमांकाच्या डंपरला थांबण्यासाठी इशारा केला. मात्र डंपर चालक पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर सोनवणे (२३, रा. नांद्रा. खुर्द, ता. जळगाव) याने वाहन न थांबवता त्याने मंडळ अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घेवून जात त्यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डंपर सोडून तो तेथून पळून गेला होता. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात डंपर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील संशयितांना अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी १६ जानेवारी रोजी सकाळी कारवाई करत चालक पुंडलिक उर्फ तेजस सोनवणे व मालक सुभाष कोळी या दोघांना अटक केली. अटकेतील दोघांना पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.