साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावात बुधवारी रात्री घरफोडीच्या दोन घटना घडल्या. तर मोटारसायकल चोरून ती गावाबाहेर सोडून चोरटे पसार झाले. एकाच रात्री गावात तीन घटना घडल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक वसंत दिघोळे हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. बुधवारी रात्री चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात एक लाख ६५ हजार रुपये रोख, ७० हजार सहाशे रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ३५ हजार ६०० रुपये ऐवज होता.
दिघोळे यांच्या घरामागे राहणारे सेवानिवृत्त अभियंता नारायण वाघ यांचेही बंद घर चोरट्यांनी फोडले. ते बाहेर गावी असल्याने त्यांच्याकडील किती रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला हे कळू शकले नाही. वाघ यांच्याकडे जानेवारी महिन्यात चोरी झाली होती. त्याचा तपास लागत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे चोरीची दुसरी घटना घडली. याच गल्लीतील श्रीमंत दिघोळे यांची मोटारसायकल चोरटे चोरून घेऊन जात असताना गावाबाहेर मोटारसायकलचे पेट्रोल संपल्यामुळे त्यांनी ती तेथेच टाकली व पसार झाले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.