साक्षीदार न्युज । Two computers stolen from office in Jalgaon | जळगाव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे दोन संगणक संच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग इंदलसिंग परदेशी यांच्या सांगण्यावरून सखी वन स्टॉप सेंटर येथील कंत्राटी सुरक्षा रक्षक शुभम हिरालाल परदेशी याने ही चोरी केल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे केली असून, आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
रफिक तडवी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, कार्यालयातील एक ‘All In One PC Lenovo’ हा संगणक संच आशादीप महिला वसतीगृहासाठी पुरवठा करण्यात आला होता. मात्र, कार्यालयीन गरजेसाठी तो २ मार्च २०२३ रोजी परत आणण्यात आला. याशिवाय ‘ All In One PC Acer ALO ’ हा दुसरा संगणक संचही कार्यालयात उपलब्ध होता. एप्रिल २०२४ मध्ये आयुक्तालयाकडून नवीन पाच संगणक संच प्राप्त झाल्यानंतर, जुन्या संगणकांचे निर्देशांकन करण्यासाठी ११ मार्च २०२५ रोजी पेंटर बोलावण्यात आले. तेव्हा हे दोन संगणक कार्यालयातून गायब असल्याचे आढळले. सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नाहीत.
तपासात असे समोर आले की, सखी वन स्टॉप सेंटर येथील कंत्राटी कर्मचारी शुभम हिरालाल परदेशी याने आपले चुलते आणि माजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग इंदलसिंग परदेशी यांच्या सूचनेवरून हे संगणक चोरले. तडवी यांनी याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. शुभम परदेशी याचे भाऊ आणि वहिनी पोलीस खात्यात कार्यरत असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचा आरोप तडवी यांनी केला आहे.
या प्रकरणात योग्य कारवाईची मागणी करताना तडवी यांनी पत्रात म्हटले आहे की, विजयसिंग परदेशी आणि शुभम परदेशी यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करावा. तसेच, चोरांना साथ देणाऱ्या पोलीस निरीक्षकांवरही कारवाई करावी. “जळगाव जिल्ह्याचे बीड होऊ देऊ नका,” अशी भावनिक विनंतीही त्यांनी केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला आहे.
LIC Smart Pension Plan 2025 ची धमाकेदार योजना: एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा 12,000 रुपयांची पेन्शन !
ATMFees | एटीएममधून पैसे काढणे महागणार: १ मे २०२५ पासून नवे शुल्क लागू
Raver Honey Trap | रावेर हनी ट्रॅप प्रकरणात 100 हून अधिक जण ,अनेकांनी आत्महत्या केल्याचा संशय ?