साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना मुंबईच्या चेंबूर परिसरातून एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला शितपेयातून गुंगीचं औषध देऊन दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्काराची घटना १५ ते १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. पीडित तरुणी मूळ पालघर जिल्ह्यातील रहिवासी असून ती चेंबूरमधील पोस्टल कॉलनी परिसरात राहते. आरोपी देखील याच परिसरात रहिवासी आहे. त्यामुळे पीडितेच्या आणि आरोपीच्या कुटुंबीयांमध्ये ओळख होती. पीडिता आणि आरोपी देखील एकमेकांना ओळखत होते. १५ नोव्हेंबरच्या रात्री पीडितेचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे पीडित तरुणी घरात एकटीच होती. दुसरीकडे आरोपीचे कुटुंबीय देखील घराबाहेर गेल्याने तो आणि त्याचा मित्र घरात पार्टी करीत बसले होते. दरम्यान, पीडित तरुणी घरात एकटी असल्याचं लक्षात येताच आरोपीने स्वयंपाकाची वस्तू हवी, असा बहाणा करत पीडितेचा दरवाजा ठोठावला.
ओळख असल्याने पीडितेने आरोपीला हवी असलेली किचनमधील वस्तू आणून दिली. यादरम्यान, आरोपीने गोड बोलून पीडितेला शीतपेय दिलं. शीतपेय प्राशन करताच तरुणी बेशुद्ध झाली. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी आणि त्याच्या मित्राने पीडित तरुणीवर बलात्कार केला. दरम्यान, तरुणी जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. याशिवाय तिला त्रासही जाणवत होता. तेव्हा शेजारील तरुणाने आपल्यावर बलात्कार केल्याचं तिच्या लक्षात आलं. या घटनेची माहिती पीडितेने आपल्या वडिलांना दिली. त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अजितकुमार यादव (वय २६ वर्ष), प्रभाकर यादव (वय ३० वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही कोर्टासमोर हजर केलं असता, कोर्टाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.