साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यभर दौरे करीत आहे तर मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. याचदरम्यान, परभणीत गेल्या ४८ तासांत मराठा समाजाच्या दोन तरुणांनी आत्महत्या केली आहे.
परभणीत गेल्या दोन दिवसांत मराठा समाजाच्या दोन तरुणांनी जीवन संपवलं आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथील २५ वर्षीय तरुणाने जीवन संपवलं आहे. पवन विष्णुकांत भिसे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी पवनने चिठ्ठी लिहून जीवन संपवलं आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. एकच मशीन मराठा आरक्षण, असा मजकूर पवनने चिठ्ठीत लिहिलं आहे. पवनने टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात शोकाकुल वातावरणात पसरलं आहे.
परभणी तालुक्यातील आर्वी येथे एका 36 वर्षीय तरुणाने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. यात सुनिल छत्रपती कदम (36) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सुनिल कदम याने अंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेला उपस्थिती लावली होती. त्यानंतर आर्वी गावात सुरु असलेल्या साखळी उपोषणातही सुनिल कदमचा सक्रीय सहभाग होता. या घटनेनंतर सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण पोलिस, नानलपेठ पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.