साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | राज्यातील मराठा समाजाला सरसकट सरकारने आरक्षण द्यावे या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते आता साखळी उपोषणाच्या माध्यमातून उद्यापासून राज्यभर दौरे देखील पाटील यांनी आखले आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर मराठा आरक्षणासंदर्भात वेळ दिला आहे. मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सर्व जिल्ह्यात नोंदी सापडत आहे. 35 ते 40 टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे समाधान असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
मनाजे जरांगे पाटील म्हणाले की, सर्व मराठा समाज एकवटलेला आहे. स्वत:च्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. गेल्या 70 वर्षात मराठ्यांची पोरं काही झाले तरी मोठे होऊ द्यायचे नाही असे षडयंत्र रचले होते. परंतु सामान्य मराठ्यांनी एकजूट केली आणि सर्व षडयंत्र हाणून पाडले. आज मराठ्यांच्या मुलांना त्यांचे उद्ध्वस्त केलेले आयुष्य पुन्हा प्राप्त होऊ लागले आहे. मग तो श्रीमंत, गरीब, शेतकरी सर्व मराठा समाजाचे कल्याण व्हायला लागले आहे. त्यामुळे आता आम्ही मागे हटत नाही. मनोज जरांगे म्हणाले की, समाजाची भूमिका प्रत्येक घरातील माणसाच्या हिताची भूमिका आहे. जो कुणी वेगळी भूमिका घेत असेल ती राजकीय आणि स्वत:च्या स्वार्थासाठी घेत आहे. मी मराठा समाजाची सेवा करतोय. सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. मी प्रामाणिकपणे सेवा करत राहणार. समाजातील शेवटच्या घटकांना आरक्षण मिळाल्याखेरीज आंदोलन थांबणार नाही आणि मीदेखील थांबणार नाही हा माझा शब्द आहे. मी सेवक म्हणून समाजाची सेवा करेन असे त्यांनी सांगितले.