साक्षीदार | २८ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून रविवारी रात्री झालेल्या पावसाने या विभागातील १० हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवर नुकसान झाले.
मराठवाड्यात १ ते २७ नोव्हेंबर परतीचा किंवा अवकाळी पाऊस कमाल १८.३ मिमी अपेक्षित असतो. मात्र यंदा रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी आठ या १२ तासातच ४१.५ मिमी (२२७% जास्त) पाऊस पडला. १०७ मंडळात अतिवृष्टीही झाली. त्यामुळे कापूस, ज्वारी, मका, तूर, भाजीपाल्याचे नुकसान झाले. रब्बीसाठी मात्र हा पाऊस लाभदायी ठरेल. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री संभाजीनगरात पुन्हा पाऊस झाला, १२ वाजेपर्यंत ४७ मिमी नोंद झाली.
विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम जिल्ह्यांनाही पावसाचा फटका बसला. वीज पडून पशुधनाचे नुकसान झाले, हजारो हेक्टरवरील भातपीकही उद्ध्वस्त झाले. बुलडाणा जिल्ह्यात २९ मंडळात अतिवृष्टी होऊन ३३,९५१ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. वीज पडून ८१ बकऱ्या व एक म्हैस, एक बैल दगावला. अकोला जिल्ह्यात ३२.६ मिमी पाऊस झाला. काही भागात गारपीट होऊन कापूस भिजला. तूर, कांदा, हरभरा पिकांचेही नुकसान झाले. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व इतर जिल्ह्यांमध्ये द्राक्ष, कांदा, डाळिंब, फळे-भाजीपाल्याचे नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला, तर लातूर, धाराशिवमध्ये तुरळक नोंद झाली. एकूण १०७ मंडळात अतिवृष्टी झाली. यात सर्वाधिक ३२ मंडळे संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. जालना २७, परभणी २३, हिंगोली १२, नांदेड १२ आणि बीड जिल्ह्यातील १ मंडळाचा समावेश आहे. हिंगाेली जिल्ह्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला.








