Government Job Scam | साक्षीदार न्यूज | एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत सरकारी नोकरी मिळवून तब्बल १७ वर्षे दोन्ही ठिकाणाहून पगार उचलणाऱ्या एका महाभागाचा प्रताप उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील या धक्कादायक प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली असून, आतापर्यंत घेतलेला पगार वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण? सत्रीख पोलीस स्टेशन हद्दीतील नरौली गावचा रहिवासी असलेल्या जयप्रकाश सिंह याने हा मोठा घोटाळा केला. जयप्रकाशची २६ डिसेंबर १९७९ रोजी प्रतापगड जिल्ह्यातील आरोग्य विभागात ‘वैद्यकीय सहाय्यक’ म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, सरकारी सेवेत असतानाच त्याने जून १९९३ मध्ये बाराबंकी जिल्ह्यातील शिक्षण विभागात ‘शिक्षक’ म्हणून दुसरी नोकरी मिळवली. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही ठिकाणी त्याने एकाच मार्कशीटचा आणि कागदपत्रांचा वापर केला होता.
१७ वर्षे यंत्रणेला ठेवले अंधारात सरकारी नियमानुसार एक व्यक्ती एकाच वेळी दोन सरकारी पदे भूषवू शकत नाही. मात्र, जयप्रकाशने दोन्ही जिल्ह्यांत १७ वर्षे आपली सेवा सुरू ठेवली. या काळात तो दोन्ही विभागांकडून नियमित पगार आणि भत्ते लाटत होता. एकाच नावाची व्यक्ती दोन वेगवेगळ्या विभागांत काम करत असूनही इतकी वर्षे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
RTI मुळे फुटले भांडण २००९ मध्ये आवास विकास कॉलनीतील रहिवासी प्रभात सिंह यांनी या संशयास्पद प्रकाराबाबत माहिती अधिकारात (RTI) कागदपत्रे मागवली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीअंती जयप्रकाश सिंह हा प्रतापगड आणि बाराबंकी अशा दोन्ही ठिकाणी कार्यरत असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर त्याला तातडीने निलंबित करून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयाचा कठोर निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) सुधा सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे जयप्रकाश सिंह याला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ वर्षे सक्तमजुरी आणि ३०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच, त्याने आजवर सरकारी तिजोरीतून घेतलेला सर्व पगार व्याजासह वसूल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.








