साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | देशभरात लोकसभा निवडणूक आता काही महिन्यावर येवून ठेपल्याने अनेक पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली असतांना वंचित बहुजन आघाडी देखील निवडणुकीसाठी कामाला लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण 48 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
शिवाय प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित केली असून त्यांच्या या उमेदवारीला येणाऱ्या खर्चास हातभार लागावा, म्हणून धुळ्यातील शंकर खरात या कार्यकर्त्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त तब्बल पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असून ते विविध ठिकाणी आदिवासी परिषदेच्या माध्यमातून आदिवासींचे हक्क आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात जनजागृती करीत आहेत. प्रकाश आंबेडकर हे काल धुळे शहराच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत आदिवासी परिषद पार पडली. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण 48 जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले असून आपण स्वतः अकोला मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.