साक्षीदार | १२ नोव्हेबर २०२३ | गेल्या काही दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना गाव बंदी केल्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक वातावरण निर्माण झाले होते. पण सध्या गावांमध्ये नेत्यांना गावबंदी असल्याचे बॅनर्स देखील लावण्यात आलेत. या बॅनर्सवरून जालन्यातील भोकरदनध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी केलेले पोस्टर फाडण्यात आलेत. त्यावरून बोरगाव जहागीर येथे दोन गटांत हणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत मराठा समाजाचे 7 तरुण जखमी झालेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावात प्रवेशबंदी करत गावातील चौकात गावबंदीचं पोस्टर एका बोर्डवर लावलं होतं.गावातीलच दुसऱ्या एका गटाने हे पोस्टर फाडून बोर्ड काढून टाकल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. मराठा क्रांती मोर्चामधील तरुणांनी रस्त्यावर असलेल्या सिसिटीव्हीच्या आधारे बोर्ड काढणाऱ्या गावातील एका गटाच्या पुढाऱ्याला याबाबत जाब विचारला.
या प्रकारानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झालीय. या हाणामारीत 7 मराठा तरुणांसह मध्यस्थी करायला गेलेले सरपंच देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी भोकरदन पोलिसठाण्यात बोर्ड काढून मारहाण करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सरपंचाला ही मारहाण झाल्याची माहिती आहे. भोकरदन पोलिसया प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.