साक्षीदार | ८ नोव्हेबर २०२३ | मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता मंदिर समिती यावर्षी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही. मराठा समाजाच्या भावना सरकारला कळवण्यात येणार आहेत. गहिणीनाथ महाराज औसेकरांसह विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षांची बैठक झाली. त्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
कार्तिकी सोहळ्याच्या तयारी संदर्भात आज मंदिर समितीची बैठक पार पडली. यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हा पेच मंदिर समिती समोर निर्माण झाला होता. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित द्यावे की अजित पवार यांना हा पेच समितीसमोर निर्माण झाला. दरम्यान आज यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘आज सर्व मराठा समाज निवेदन देऊन गेला, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत आम्ही कोणत्याही मंत्र्याला व पुढाऱ्याला पंढरपुरमध्ये आम्ही येऊ देणार नाही. आम्ही ही गोष्ट राज्य शासनाच्या कानावर आणि विधी व न्याय विभागाच्या कानावर घालू तो निर्णय घालू’, असंही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी बैठकीनंतर म्हटलं आहे.