साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात आंदोलन केलं जात आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमिवर आज जालना येथील अंतरवली सराटी गावात भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार आहेत. या जंगी संभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, “जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत, आजपासून सरकारच्या हातात १० दिवस आहेत. आज मिळेल त्या जागी मराठा समाज उभा राहणार आहे. राज्यातील मराठ्यांसाठी हा सुवर्णक्षण आहे. याला स्वतः साक्षीदार व्हायचं आहे. आज एकह मराठा घरी थांबणार नाही. सर्व मराठे अंतरवलीकडे निघणार आहेत.” “सरकारने आता भावनाशून्य होऊ नये. ही वेदना आणि त्रास सरकारने ओळखून सरकारने १० दिवसांत आरक्षण द्यावं. आम्ही ते मिळवणारच असेही मनोज जरांगे म्हणाले. मी सगळा उलगडा करणार आहे. मी माझ्या समाजासमोर वस्तुस्थिती मांडणार आहे. कारण माझा समाज माझा मायबाप आहे. ते ऐकण्यासाठीच आले आहेत आणि ते त्यानंतर शांततेत घरी जाणार आहेत”, असेही जरांगे यावेळी म्हणाले.
“आम्ही ११०० एकरची पार्किंगची सुविधा केली आहे आणि १७० एकर रान वाढवलं आहे. कारण आमचा समाज घरात राहाणार नाहीये. त्याला साक्षिदार व्हायचं म्हणून आम्ही सर्व सोय केली आहे.” असंही जरांगे म्हणाले.