साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय तापला असून अनेक जिल्ह्यातील काही गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केल्याची पहिला फटका सत्ताधारी नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला आहे. मराठा आंदोलनकांनी त्यांना काळे झेंडे दाखविल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अजित पवार संबोधनासाठी उभे राहिले आणि त्यांचे भाषण सुरु होताच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. यानंतर आपण २५ तारखेपासून कठोर अमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यादरम्यान राज्यातील अनके गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय देखील घेण्यात येत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील माढा लोकसभा मतदार संघात बंदी घातल्याचीघोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली होती. त्या पार्श्वभुमिवर कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.