साक्षीदार | १६ नोव्हेबर २०२३ | राज्यभरातील अनेक महिलावर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना मुंबई शहरातून समोर आली आहे. एका ३८ वर्षीय नराधमाने डॉक्टर महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने ब्लॅकमेल करून महिलेकडून लाखो रुपये देखील उकळले आहे. ही संतापजनक घटना मुंबईच्या गावदेवी परिसरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची ओळख एका क्लबमध्ये बँटमिंटन खेळताना झाली होती. कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली. पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत नेहमी वाद होते. मी दोघांमधील वाद मिटवून देतो, असं म्हणत आरोपीने पीडितेला विश्वासात घेतलं. २० ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेला एका क्लबमध्ये बोलावले. दरम्यान, क्लबमध्ये गेल्यानंतर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने दारू पाजली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेला कारमधून आपल्या घरी नेले. तिथे गेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
यादरम्यान आरोपीने पीडितेचे अश्लिल व्हिडीओ देखील काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याच व्हिडीओचा आधार घेऊन आरोपीने पीडितेकडून पैसे देखील उकळले. दरम्यान, दिवसेंदिवस आरोपीचे कृत्य वाढत असल्याने पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे.