साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | देशात सर्वात सुरक्षित प्रवास मानल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये गेल्या काही वर्षापासून ज्या घटना घडत आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवास देखील सुरक्षित राहिलेला नाही. एका प्रवासी महिलेचा धावत्या लोकलमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.या प्रकरणी २७ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एका २७ वर्षीय तरुणाने प्रवासी महिलेचा विनयभंग केला. मध्य रेल्वेवर डोंबिवली ते घाटकोपर स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी या घटनेबाबत बुधवारी ही माहिती दिली. डोंबिवली-घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमध्ये सोमवारी संध्याकाळी हा संतापजनक प्रकार घडला. ३५ वर्षीय महिला पतीसोबत लोकलच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. त्याचवेळी या तरुणाने तिचा विनयभंग केला. हरिश असं संशयित आरोपीचं नाव आहे. तो विक्रोळी येथील रहिवासी आहे. लोकलच्या ज्या डब्यातून महिला प्रवास करत होती, त्याच लोकलच्या डब्यात डोंबिवली येथे आरोपी चढला. प्रवासादरम्यान त्याने पीडित महिलेचा विनयभंग केला. महिलेने या प्रकारानंतर आरडाओरड केली. त्यानंतर तिच्या पतीने आणि इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली. आरोपीला पकडून त्यांनी घाटकोपर पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला आहे.