Forest Department यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यात वन विभागाने सागवान लाकूड तस्करीवर मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावल वन विभागाच्या पश्चिम परिक्षेत्राने गुप्त माहितीच्या आधारे ही धाडसी कारवाई पार पाडली. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव–किनगाव मार्गावर रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास सापळा रचण्यात आला. दरम्यान संशयित महिंद्रा पिकअप (MH 04 EL 7658) वाहन अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान प्लास्टिक क्रेटखाली लपवून ठेवलेले सागवान जातीचे लाकूड आढळून आले.
वन विभागाने ०.१७७ घनमीटर (८ नग) सागवान लाकूड जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ₹3,939/- आहे. यासोबतच जप्त वाहनाची किंमत ₹5,25,000/- असून एकूण ₹5,28,939/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. कारवाईदरम्यान वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. जप्त केलेले वाहन व लाकूड शासकीय काष्ठ आगार, यावल येथे जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) यांनी प्रथम अहवाल क्र. ०६/२०२६, दि. ११ एप्रिल २०२६ नोंदवून भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१(२)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहाय व सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत प्रशांत जोशी (वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पश्चिम) यांच्यासह विपुल पाटील, संजय इंडे, हरीपुरा परिमंडळ अधिकारी तसेच वनरक्षक हनुमंत सोनवणे, चेतन शेलार, अक्षय रोकडे, इंदल चव्हाण, मोहन कच्छवाह, आनंद तेली, श्रीमती सरला भोंगरे, श्रीमती सीमा भालेराव आदींचा सहभाग होता. वन संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वन विभाग सतर्क असून अशा बेकायदेशीर तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.









