CSC Scam India यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील विविध गावांमध्ये कार्यरत असलेल्या जनसुविधा केंद्रांमार्फत (CSC) शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल ₹16 कोटी 63 लाख 48 हजार 85 रुपयांचा अपहार झाल्याची माहिती समोर आली असून, 2,041 शेतकरी या घोटाळ्याला बळी पडले आहेत.
या प्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 80/2026 अंतर्गत भा. द. सं. कलम 318(4), 336(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भरत वामन वारे (वय 52) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, साकळी, निमगाव, मनवेल, भालोद, मोहाळे व यावल येथील विविध CSC केंद्र चालकांनी संगनमताने हा गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे.
काय आहे प्रकरण? प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 साठी विमा नोंदणी करताना संबंधित CSC केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक यांसारखी कागदपत्रे घेतली. मात्र, प्रत्यक्षात पीक न लावलेल्या क्षेत्राचे खोटे दाखले तयार करून मोठ्या प्रमाणावर विमा रक्कम मिळविण्याचा कट रचण्यात आला.
फसवणुकीचे धक्कादायक आकडे
2,041 शेतकरी प्रभावित
2284.9 हेक्टर क्षेत्र नोंद
प्रत्यक्षात नसताना 2437.39 हेक्टर दाखवले
तब्बल 1089.28 हेक्टर अतिरिक्त क्षेत्र दाखवले
या बनावट माहितीच्या आधारे शासनाची फसवणूक करून कोट्यवधींचा अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात साकळी, निमगाव, मनवेल, भालोद, मोहाळे व यावल येथील विविध CSC केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांच्या नावावर चालणाऱ्या योजनांचा गैरवापर करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.








