Gram Panchayat यावल | मिलिंद जंजाळे | मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये अचानक स्वच्छता मोहीम सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत सहभाग घेतलेल्या ग्रामपंचायतींकडून पुरस्काराच्या दृष्टीने अल्पावधीत स्वच्छतेचे काम करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून गावांमध्ये अस्वच्छतेची समस्या कायम असताना नागरिकांच्या तक्रारींकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच रस्ते झाडणे, गटारी साफ करणे अशा कामांना अचानक गती देण्यात आल्याचे दिसून आले.
यासंदर्भात काही पत्रकारांनी समस्या मांडल्यानंतर काही ठिकाणी संबंधित पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, नागरिकांनीही या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “अधिकाऱ्यांच्या दौऱ्यावेळीच स्वच्छता केली जाते, त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
या घडामोडींमुळे स्वच्छता व्यवस्थापनाच्या सातत्यावर आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्वच्छता ही केवळ दौऱ्यापुरती मर्यादित का राहते?
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांकडे दुर्लक्ष का केले जाते?
प्रशासनाकडून दीर्घकालीन उपाययोजना कधी राबवल्या जाणार?
नागरिकांनी नियमित आणि जबाबदार स्वच्छता व्यवस्थेची अपेक्षा व्यक्त केली असून, प्रशासनाकडून यावर ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








