Yawal Rural Hospital | यावल | मिलिंद जंजाळे | येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या जवळपास एक वर्षापासून एक्स-रे मशीन बंद अवस्थेत असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातग्रस्त रुग्ण, हाडांचे विकार असलेले रुग्ण तसेच विविध आजारांनी त्रस्त नागरिक उपचारासाठी रुग्णालयात येतात; मात्र एक्स-रे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यांकडे किंवा इतर शहरांकडे वळावे लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि तात्काळ आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने शासनाने ग्रामीण रुग्णालयांची उभारणी केली आहे. मात्र यावल ग्रामीण रुग्णालयातच मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. वर्षभरापासून एक्स-रे मशीन बंद असूनही त्याची दुरुस्ती किंवा नवीन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडून ठोस पावले उचलली गेली नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत असताना एक्स-रे सुविधा नसल्यामुळे डॉक्टरांनाही निदान प्रक्रियेत अडचणी येत आहेत. परिणामी रुग्णांना चोपडा, जळगाव किंवा खासगी रुग्णालयांमध्ये एक्स-रे काढण्यासाठी जावे लागत आहे, ज्यामुळे वेळ आणि पैशांचा मोठा खर्च होत आहे.
दरम्यान, आरोग्य व्यवस्थेतील या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आरोग्य प्रशासनाने पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “रुग्णांच्या जीवाशी संबंधित प्रश्न असताना लोकप्रतिनिधी झोपेत आहेत का?” असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
यावलसारख्या मोठ्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात वर्षभर एक्स-रे मशीन बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन मशीन दुरुस्त करावी किंवा नवीन मशीन उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात येत आहे.








