ST Bus Accident | यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील यावल-टाकरखेडा मार्गावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास एसटी बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या इको कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह सुमारे १० ते १२ लहान विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
एमएच ४० एन ९८४५ क्रमांकाची यावल-टाकरखेडा मार्गावरील एसटी बस भालशिव पिंप्री फाट्यावरून जात असताना, भालशिव पिंप्रीकडून यावलमधील एका खासगी शाळेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एमएच ३७ जी ६६८० क्रमांकाची इको कार समोर आली. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने अपघात घडला.
एसटी बसचे वाहक एस. एम. पाटील व चालक ए. ए. तडवी असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले, तर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. विद्यार्थी वाहतूक करणारी इको कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली तसेच जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांची सर्रास सुरू असलेल्या अवैध वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.








