Yawal News यावल | मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई कायम असून स्थानिक महिलांचा संताप आता उफाळून आला आहे. या समस्येमुळे महिलांना दररोज मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संदर्भात परिसरातील महिलांनी एकत्र येत निवेदन सादर केले असून त्यावर तब्बल ४३ महिलांच्या सह्या आहेत. पाण्याच्या प्रश्नाबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासने मिळाल्याचे महिलांनी नमूद केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत महिलांना दररोज सुमारे ५ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर महिलांनी प्रशासनाकडे तातडीने पाणीपुरवठ्याची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, येत्या ६ एप्रिल २०२६ (सोमवार) रोजी पंचायत समिती, यावल कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, “आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये आणि प्रशासनाचीही नाचक्की होऊ नये, यासाठी लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी,” अशी विनंतीही महिलांनी निवेदनातून केली आहे.
या निवेदनाची प्रत आयुक्त, जिल्हा परिषद जळगाव तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








