साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असतांना आता राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या देखील घटना देखील घडल्या. तर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आगामी ४ दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.