जळगाव ; – लग्नात नाचत असताना दिलेल्या खुन्नस वरून एका तरुणाला दोन जणांनी बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार चंदू अण्णानगर परिसरात असलेल्या गॅस गोडाऊनजवळ सोमवारी १ जानेवारी रोजी घडला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रेम कमलाकर पाटील वय-१९ रा.अहुजा नगर, छोटे हनुमान मंदिराजवळ, जळगाव या तरुणाने लग्नात नाचताना खुन्नस दिली होती. त्यानुसार या रागातून १ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता चंदू अण्णा नगरातील गॅस गोडाऊन जवळ प्रेम पाटील याचा रस्ता अडवत अनिल कोळी आणि रोहित (पूर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. निमखेडी, जळगाव या दोघांनी खुन्नस का देतो, असे म्हणून त्याच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले आणि जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर दोघे पसार झाले. या घटनेबाबत प्रेम पाटील यांनी मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अनिल कोळी आणि रोहित (पूर्ण नाव माहित नाही) दोघे रा.निमखेडी या दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.