साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील एका रेल्वे लाईनवरील रेल्वेरूळावर १३ नोव्हेंबर रोजी सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एका तरूणाचा जखमीवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात दिपक सुकलाल सोनवणे (वय-२४) असे नाव असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचन नगर परिसरात दिपक सोनवणे हा तरूण आई, वडील भावासोबत वास्तव्यास असून कटलरी व मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिपक सोनवणे हा कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर निघून गेला होता. दरम्यान भादली ते जळगाव अप रेल्वे रूळावरील खंबा क्रमांक ४२०च्या २६ ते २८ च्या दरम्यान सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दिपक सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत रेल्वेवरील लोको पायलट रामेश्वर प्रसाद यांनी वॉकीटॉकीवरून शनीपेठ पोलीसांना कळविले. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रविंद्र पाटील, परिष जाधव, मुकुंद गंगावणे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनाम करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. तरूणाचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व मित्र परिवाराची मोठी गर्दी होती. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय चंद्रकांत धनके करीत आहे.