Jalgaon Cultural Event | जळगाव | जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड चे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच निमित्ताने अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘भक्ती संगीत संध्या’ या विशेष कार्यक्रमाद्वारे मोठेभाऊंना स्वरांजली अर्पण केली.
मोठेभाऊंनी नेहमीच ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांवर दादाजींसारखी माया व प्रेमाचा वर्षाव केला होता. त्या आत्मीयतेच्या स्मरणार्थ ‘भाऊंच्या उद्यानात’ हा हृदयस्पर्शी सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, अनुराधा बेरा, विक्रांत जाधव, शुभदा नेवे, निरज शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘पांडुरंग नामी लागलासी ध्यास…’ या भक्तीगीताने झाली. त्यानंतर ‘देवा इंद्रायणी थांबला…’, ‘तुझ मे राम मुझ मे राम…’, ‘शोधिसी मानवा राउळी मंदिरी…’, ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…’, ‘माझे माहेर पंढरी…’ अशी भक्तीगीते विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भावपूर्ण सादर केली.
या संगीत संध्येतून केवळ गायनाचा आनंद नव्हे, तर मोठेभाऊंच्या जीवनमूल्यांचा जागर करण्यात आला. देशप्रेम, पर्यावरणाविषयी जागरूकता, मानवतेचा संदेश आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून प्रभावीपणे अधोरेखित झाली. या स्वरमयी आदरांजलीने उपस्थितांची मने जिंकून घेतली.








