Petrol Diesel Price | साक्षीदार न्यूज | आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका-इराण दरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या देशातील सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्रीत मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पेट्रोलमागे सुमारे १८ रुपये प्रति लिटर तर डिझेलमागे तब्बल ३५ रुपये प्रति लिटर इतका तोटा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या तोट्याची भरपाई करण्यासाठी कंपन्यांकडून दरवाढीचा पर्याय विचाराधीन असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही काळापासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मध्य पूर्वेतील तणाव आणि जागतिक पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेले आहेत. अशा परिस्थितीतही देशातील इंधन दर दीर्घकाळ स्थिर ठेवण्यात आले होते.
विशेष म्हणजे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपन्यांनी एप्रिल २०२२ पासून इंधन दरांमध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही. मात्र, वाढत्या तोट्यामुळे ही स्थिती अधिक काळ टिकवणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मॅक्वेरी ग्रुपच्या अहवालानुसार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह पाच राज्यांमधील निवडणुका पूर्ण झाल्यानंतर इंधन दरात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, तेल कंपन्यांचे दररोजचे नुकसान काही प्रमाणात कमी झाले असले तरी अद्यापही ते हजारो कोटी रुपयांमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात पेट्रोलचे दर १२५ रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.या संभाव्य दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा आणखी ताण येण्याची शक्यता आहे.









