Chatra Plane Crash |साक्षीदार न्यूज | झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्यात रांचीहून दिल्लीकडे निघालेली एअर एंबुलन्स दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे. सिमरिया थाना क्षेत्रातील करमाटांड़ गावाजवळील जंगल परिसरात ही दुर्घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी रुग्ण संजय कुमार यांच्या मृत्यूची बातमी समोर आली असून इतर प्रवाशांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेडबर्ड एअरवेज प्रा. लि.ची बीचक्राफ्ट C90 (नोंदणी क्रमांक VT-AJV) ही एअर एंबुलन्स सोमवार सायंकाळी 7:11 वाजता रांचीहून दिल्लीसाठी उड्डाण केले होते. सायंकाळी 7:34 वाजता अटाली परिसरात कोलकाता एरिया कंट्रोलशी संपर्क तुटला आणि त्यानंतर विमान रडारवरूनही गायब झाले.
विमानात एकूण 7 जण प्रवास करत होते. त्यामध्ये 1 रुग्ण, 1 डॉक्टर, 1 पॅरामेडिक, 2 नातेवाईक, 1 मुख्य पायलट (PIC) आणि 1 सह-पायलट यांचा समावेश होता. रुग्णाची ओळख लातेहार जिल्ह्यातील चंदवा येथील संजय कुमार अशी झाली आहे. त्यांच्यासोबत अर्चना देवी आणि धुरु कुमार हे नातेवाईक होते.
विमानाचे पायलट कॅप्टन विवेक विकास भगत आणि कॅप्टन सवराजदीप सिंह होते. वैद्यकीय पथकात डॉ. विकास कुमार गुप्ता आणि पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा यांचा समावेश होता.
संजय कुमार यांना 16 फेब्रुवारी रोजी रांची येथील देवकमल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पेट्रोलियम पदार्थामुळे लागलेल्या आगीत त्यांचे सुमारे 63 टक्के शरीर भाजले होते. 22 फेब्रुवारी रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास वाढल्याने HFNO ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला होता. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्ली येथे हलविण्यात येत होते.
घटनेनंतर रात्री 8:05 वाजता रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (RCC) सक्रिय करण्यात आले. स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच चतरा जिल्हा प्रशासन आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
डीजीसीएच्या माहितीनुसार, विमान झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कसारिया पंचायत क्षेत्रात कोसळले. संपर्क तुटण्याचे ठिकाण वाराणसीपासून सुमारे 100 नॉटिकल मैल दक्षिण-पूर्व असल्याचे सांगण्यात आले आहे. अपघाताची चौकशी करण्यासाठी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची टीम रवाना करण्यात आली आहे.या दुर्घटनेमुळे परिसरात शोक आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.







