Dr Babasaheb Ambedkar | उरुळी कांचन | येथे साने संगीत क्लासेस व साने कला मंचाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चवदार तळे सत्याग्रहाचा संदर्भ देत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ पाणी पिऊन तहान भागवली नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या अस्पृश्यतेविरोधात ऐतिहासिक लढ्याची सुरुवात केली. तसेच माजी शिक्षणाधिकारी प्रभाकर खरात यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, दीन-दुबळ्यांच्या हक्कांसाठी लढणारे महामानव आणि जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व असल्याचे नमूद केले. जयंतीनिमित्त त्यांनी बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन अर्पण केले.
या कार्यक्रमास पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, पंचायत समितीच्या सदस्या कोमल गणेश कांबळे, माजी शिक्षण अधिकारी प्रभाकर खरात, माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे, पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय तुपे, प्रा. सुरेश वाळेकर, पत्रकार सुवर्णा कांचन, सुनिल तुपे, साने कला मंचाच्या अध्यक्षा रेखा साने, पंकज लोंढे तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव शिवराज साने यांनी बाबासाहेबांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही संघर्ष करत यश संपादन केले आणि संकटांना संधी मानून पुढे गेले, त्यामुळेच त्यांचे कार्य आज जागतिक स्तरावर गौरवले जाते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनिल तुपे यांनी मानले. हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव न राहता विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून बाबासाहेबांच्या विचारांची जाणीव अधिक दृढ करणारा ठरला.









